आपले मन आणि आजार

आपले ‘मन’ आजारी पडू शकते का?

होय!

आपल्या शरीराला जसे वेगवेगळे आजार वेळोवेळी होऊ शकतात तसेच आपले मन देखील आजारी पडू शकते.

त्याला देखील देखभालीची,मानसिक नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धतींची,प्रसंगी उपचार आणि समुपदेशनाची गरज लागू शकते.

आपले मन आजारी पडू शकते हे ओळखणे आणि स्वीकारणे आणि त्यासाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे यातून आपण आपले आयुष्य निरोगी आणि सुदृढ पद्धतीने जगू शकतो.

मनोविकार किंवा मानसिक आजार म्हणजे काय?

निरोगी माणसाच्या मनात येणारे विचार, त्याच्या भावना आणि त्या माणसाचं वागणं यामध्ये एकप्रकारे सुसंगती आणि संतुलन असते.

मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीच्या विचार,भावना आणि वागण्यात हे संतुलन वेगवेगळ्या प्रमाणात बिघडलेले दिसून येते. त्यामुळे अशा व्यक्तीला इतर लोकांशी वागतांना,बोलतांना अडचणी येतात आणि त्यांच्याशी जमवून घेणे कठीण होते.

आपली स्वतःची व्यक्तिगत कामे आणि दैनंदिन कामे सुरळीतपणे करणे अशा व्यक्तीला कठीण जाते.

हळूहळू अशा व्यक्तीचे स्वतःचे आयुष्य आणि त्याच्याशी जवळच्या नात्याने निगडीत असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यावर ताण निर्माण व्हायला सुरुवात होते.

असे घडत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ही लक्षणे आपोआप बरी होत नसतात.

काळ गेला की थोड्या दिवसात आपोआप ठीक होईल असे मनोविकारांच्या बाबतीत खरे नसते.

आपल्या शरीराला जसे विविध आजार वेळप्रसंगी होऊ शकतात तसेच आपले मन देखील आजारी पडू शकते, हे शक्यतो लवकरात लवकर स्वीकारले तर उपचारांची मदत लवकर मिळू शकते.

मानसिक आजारांकडे दुर्लक्ष केला तर ते वाढू शकतात आणि व्यक्तींचे आणखी नुकसान करू शकतात.

मानसिक आजार कोणाला होऊ शकतो?

आपल्यापैकी कोणालाही आयुष्यात कधीही मानसिक आजाराचा सामना करावा लागू शकतो.

चारपैकी एका व्यक्तीला आपल्या आयुष्यात मनोविकाराची लक्षणे कधी न कधी जाणवू शकतात.

आपल्याला मानसिक आजार झालेला असू शकतो हे ओळखणं आणि त्यासाठी उपचार घेण्याची गरज आहे हे समजून घेऊन त्या प्रमाणे उपचार करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

अनुभवी मानसोपचार तज्ञाकडून आपल्याला झालेल्या आजाराचे स्वरूप समजून घेऊन उपचार करून घेणे हे निरोगी जगण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.

मनोविकाराच्या लक्षणांचा कालावधी आणि त्यांची तीव्रता प्रत्येक व्यक्तीप्रमाणे, तिच्या आजाराप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे कमीअधिक असू शकते.

हे आजार स्त्री-पुरुष, लहान-मोठे, गरीब-श्रीमंत अशा कोणत्याही स्तरातील व्यक्तीला होऊ शकतो.

व्यक्तीच्या स्वभावात दोष आहे म्हणून हा आजार होतो असं नाही.

वेळेत योग्य उपचार घेतल्यास व्यक्ती बरी होऊ शकते आणि आनंदी, अर्थपूर्ण जीवन जगू शकते.

Call
Whatsapp
Appointment