जगण्यातलं शिकणं

सकाळी साडेनऊ पावणेदहाची वेळ. सिग्नलवर एका बाजूला लोकांचा घोळका.

काय झालंय हे बघण्याची प्रत्येकाला उत्सुकता.

छोट्या मुलीचा जोराने रडण्याचा आवाज आणि गर्दीतल्या लोकांचा बोलण्याचा आवाज.

आपल्या मुलाला क्लासला सोडण्यासाठी म्हणून माझी मैत्रीण गाडीतून निघालेली.

गर्दीत भर रस्त्यात गाडी उभी करून तिला उतरता येईना पण तिचा बारा वर्षाचा मुलगा तिच्या शेजारून पट्कन उतरला.

अरे नको.., असे म्हणेपर्यंत तर तो गर्दीपर्यंत गेलाही.

सिग्नल ओलांडून गाडी लावून परत आली तर तिला दिसलं, रस्त्यावर सिग्नलवर भीक मागणाऱ्या छोट्या मुलीला धक्का देऊन एक चारचाकीवाला घाईने निघून गेला होता.

तिच्या एका पायाला चांगलाच मार लागला होता, रक्त वगैरे फारसं नव्हतं येत,पण खरचटलं होतं अंग आणि कदाचित पायाच्या हाडाला दुखापत झाली असावी.

तिच्या बरोबर अजून एक तिच्याच वयाचा मुलगा सोबत होता, घाबरून तो ही रडत होता.

थोड्याच वेळात हळूहळू दुर्लक्ष करून लोकांनी काढता पाय घ्यायला सुरवात केली.

भिकाऱ्याच्या मुलीला लागलं त्यासाठी आपला अमूल्य वेळ खर्च करायची कोणाची तयारी नव्हती.

“कडमडतात कशाला मध्ये..पासून ते अशीच अद्दल घडली पाहिजे” पर्यंत लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या.

काही जण चुटपूटत होते पण दुरूनच पुढे होऊन तिला मदत करावी असे काही कोणाला वाटले नाही.

जसे काही कोणा माणसाच्या नाही, तर कुत्राच्या पिल्लाला धक्का लागलाय.

तसे झाले असते तरी कदाचित खूपजणांचा जीव कळवळला असता!

एकीने आपल्याजवळची पाण्याची बाटली तिला दिली पण तिला उचलून रस्त्याच्या बाजूला तरी न्यावे असे कोणालाही वाटले नाही.

असा प्रयत्न करणाऱ्या मैत्रिणीच्या मुलाला मात्र एकाने सल्ला दिला..

कशाला या भानगडीत पडतोस..घरी मार बसेल किंवा तुझ्याच गळ्यात पडेल सगळं!

मैत्रीण त्या जागेवर आल्यानंतर मुलाने व तिने मिळून छोटीला रस्त्याच्या बाजूला हळूच उचलून नेले.

पायावर सूज नव्हती पण मुलगी खूप घाबरून गेली होती.

सिग्नलवर पोलीस नव्हतेच. मग या दोघांनी मिळून तिला जवळ असलेल्या दवाखान्यात नेलं.

सुदैवाने हाड मोडलेले नव्हते म्हणून प्राथमिक उपचार झाले.

हळूहळू तिचं रडणं पण कमी झालं..अजूनही तिची चौकशी करत कोणीही मोठं माणूस आलं नाही.

आता तिला कुठे सोडायचं हा या दोघांनाच प्रश्न पडला. त्यासाठी मैत्रिणीचा मुलगा तर कावराबावरा झाला.

पण त्या दोन छोट्यांनीच त्यांचा प्रश्न सोडवला. त्यांच्या सोबत बाहेर पडलेले ते दोघे लहान जीव परत सिग्नलवर जाऊन उभे राहिले.

त्यांनी दिलेला बिस्किटचा पुडा उघडत,जणू काही झालंच नव्हतं! मैत्रिणीच्या मुलाचा क्लास तर त्या दिवशी होऊ शकला नाही.

आणि त्याबद्दल त्या दोघांनाही काहीच वाईट वाटलं नाही. गप्पांच्या ओघात हा अनुभव माझ्यापर्यंत आला आणि त्या दिवशी, त्या प्रसंगात झालेल्या लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल आम्ही तिघे बोललो. अशा प्रसंगात मनात मदतीला जाण्याची भावना निर्माण होणं हे नैसर्गिक आहे.

पण कोणाच्या मनात एखाद्या प्रसंगात काय भावना निर्माण होईल हे मात्र व्यक्तीनुसार वेगवेगळे आहे.

जशी त्या दिवशी तिथे हजर असलेल्या आणि न थांबता घाईने निघून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगवेगळी होती. घडलेल्या घटनेत मुलाने आणि मैत्रिणीने फक्त बघ्याची भूमिका न घेता वेदनेने कळवळणाऱ्या छोट्या मुलीला मदत केली.

मुलीबद्दल सहानुभूती वाटणं, ती लहान आहे म्हणून जाणीव वाटणं हा भाग भावनिक आहे.

गर्दीतल्या प्रत्येकाचा भावनिक विकास जितका, तितकी आणि तशी त्याची प्रतिक्रिया.

पण आपल्या मनात येणाऱ्या भावनेला ओळखून त्याला अनुकूल अशी कृती करणं हे इतक्या मोठ्या गर्दीतून फक्त दोघांना जमलं..

असं का झालं असावं? गर्दीतल्या इतर कोणाकडे हृद्य नाही? की भावना नाहीत?

गर्दीतल्या अनेकांना सहानुभूतीची भावना वाटलेली असू शकते. पण प्रत्येकाला प्रत्येकवेळी आपल्या भावनेला अनुरूप वागता येतं, असं नाही. कित्येक वेळेला आपल्यालाही नाही का वेळ निघून गेल्यावर अरे, आपण असे वागायला हवे होते!…अशी चुटपूट लागून राहते.

आपल्या हातून योग्य वेळी योग्य कृती घडणे, याचे समाधान काही वेगळेच असते. आणि योग्य वागण्याचे प्रत्येकाचे निकष सुद्धा वेगळे असतात. या घटनेत मदत न करण्याचे देखील समर्थन एखादा बुद्धिवादी करू शकतो. माझ्या मैत्रिणीपेक्षा देखील मला तिच्या मुलाचे कौतूक वाटले. कारण ती देखील तर सुरवातीला “अरे नको..” असे म्हणाली होती. आणि मग नंतर आल्या प्रसंगाला सामंजस्याने सामोरी गेली.

पण तरीही मुलाच्या या प्रतिक्रियेमागे त्याच्यावर असलेल्या पूर्वसंस्कारांचा आणि मोठ्यांच्या वागण्याच्या अनुकरणाचा भाग आणि महत्त्व नक्कीच आहे.

कारण सगळीच मुलं अशा प्रसंगात त्याच्यासारखी वागणार नाहीत. म्हणून त्या मुलाच्या या वागण्याला प्रोत्साहन मिळालं की भविष्यात त्याच्या अंगातली ही संवेदनशीलता तशीच टिकून राहील.

आणि अशी संवेदनशीलता म्हणजे भावनिक भाबडेपणा किंवा दुबळेपणा नाही. कारण भावनेने विचार करणं म्हणजे दुबळेपणा असा गैरसमज अनेकांचा असतो.

आपल्याकडे मिळणाऱ्या शालेय शिक्षणात मुलांचा फक्त बौद्धिक विकास कसा होईल याचा विचार केलेला असतो. बुद्धीचे मूल्यमापन करून त्याचे मोजमाप मार्कांमध्ये केले जाते.

त्या माहीती/ ज्ञानामुळे त्याची बुद्धी वाढते पण त्या बुद्धीचा उपयोग व्यवहारात होण्यासाठी लागणारी लवचिकता त्याच्यात निर्माण होऊ शकत नाही. आपल्या शालेय अभ्यासक्रमात अजूनही या त्रुटी आहेत.

मुलांच्या सर्वांगीण विकासात मुलांचा केवळ बुद्ध्यांक (IQ) नाही तर भावनांक (EQ) देखील तितकाच महत्वाचा आहे. कारण शालेय शिक्षणात व्यक्तीच्या भावनेचा विकास आणि त्याचे मूल्यमापन करणे हे अत्यंत अवघड आहे.

कारण व्यक्तीच्या भावना हे व्यक्तिगत मूल्य आहे. म्हणून शालेय शिक्षणातून बाहेर पडणाऱ्या मुलांचे केवळ बौद्धिक व्यक्तिमत्व घडलेले असते. सर्वांगीण नाही.

बुद्धीला भावनेची जोड असेल तर व्यक्तीचा स्वभाव घडतो. भावनेचा विकास घडून येण्यासाठी “शाळा” फारशी उपयोगी नाही हे लक्षात आले तर आता उरतात फक्त दोन महत्वाच्या गोष्टी.

त्यातली एक आहे “कुटुंब” आणि दुसरी आहे “समाज” कुटुंबातून आणि समाजाकडून मिळणाऱ्या मूल्यांमधून भावना कशा हाताळायच्या याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शिक्षण मिळते.

खरेतर अप्रत्यक्षच, जास्त कारण मुले हमखास मोठ्यांच्या अनुकरणातून शिकतात.

आणि याबाबतीत बोलायचे एक असते आणि वागायचे मात्र हमखास वेगळे असते हे मात्र मुलांना पावलोपावली बघायला मिळते, घरात आणि समाजातदेखील.

“गाढवा, तुला किती वेळा सांगितले की बोलतांना शिव्या वापरायच्या नाहीत, कधी कळणार तुला?”

मधील फक्त “गाढवा”च मुलांनी उचललेले असते आणि नंतर इतर कोणावर वापरून बघितलेले असते! आपल्या रोजच्या जगण्यात मुलांच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांबद्दल मुलांशी ज्या घरात मोकळेपणाने संवाद होऊ शकतो त्या घरातील मुलांना आपल्या मनातील नैसर्गिक भावनांना कसे हाताळायचे हे बरोबर समजते.

सत्य,प्रेम,अहिंसा,आदर ही जीवनमूल्ये सार्वकालिक आहेत. ती कधीही बदलणार नाहीत कारण तीच माणूसपण घडवणारी मूल्ये आहेत, आणि ती भावनिक विकासातून साध्य होतात.

बुद्धीचा वापर करून या मूल्यांची केवळ माहिती मिळेल,ज्ञान वाढेल पण भावनिक संवेदनशीलता अंगात असेल तर ही मूल्ये मुलांच्या वागण्याचा आणि जगण्याचा भाग बनतील.

सद्सदविवेक आणि वागण्यातील शहाणपण याची जाणीव कुटुंबात असेल तर न शिकवता मुलांमध्ये आपोआप येईल. आजकाल जिकडे तिकडे फक्त मार्कांचा आणि विषयांचा बाऊ करतांना दिसून येतो, पालक आणि मुले मिळून इतरांवर बौद्धिक कुरघोडी करण्यासाठी सम,दाम,दंड,भेद वापरतांना दिसतात.

पालकांचा हेतू मुलांचे फक्त करिअर घडवणे आहे की मुलांना जीवनातल्या चढ उतरांसाठी सक्षम करणे आहे? कधी बदलणार हे चित्र?

कोंबडी आधी की अंड आधी, अर्थात याचं उत्तर आहे, कोंबडी आधी! मुले सुजाण व्हायला हवी असतील तर आधी पालकांनी सुजाण व्हायला हवे!

आणि केवळ बुद्धीने नाही तर भावनांनी आणि वृत्तीने सुजाण. आपल्याला रोबोट नाही तर चांगली माणसे घडायला हवी आहेत!

Call
Whatsapp
Appointment