खरंच इतकं कठीण आहे….??

“कुणाल इतका चिडला की कोणाला काही समजायच्या आत त्याने समोरच्या टी.व्ही वर जोरदार लाथ मारली.

क्षणभर सगळेजण अवाक् झाले..तो स्वतःही..आणि मग पुन्हा कोणाला काही कळायच्या आत बाबांनी त्याला जोरात पेपरवेट फेकून मारला..इतका की कुणाल खाली पडला आणि पडतांना त्याला डोळ्याजवळ टीव्ही कॉर्नर लागला..

Tडोळ्यापासून कानाच्या जवळपर्यंत कापलं गेलं..सगळीकडे रक्तच रक्त. सगळा गोंधळ.

धावाधाव..डोळ्याच्या खाली सहा टाके घातले डॉक्टरांनी..

हे घडलं तेव्हापासून घरात कर्फ्यू सुरु आहे, कोणीच कोणाशी बोलत नाहीये.

बाबा घरात नसतात त्यावेळी आजी-आजोबा आणि आई एकमेकांत खुसफुसत बोलत असतात बाबांविषयी..

कुणालने आपल्या रूम मध्ये स्वतःला कोंडून घेतलंय..आई सकाळ संध्याकाळ नाष्टा,जेवण आणि गोळ्या तिकडेच नेऊन देते त्याला. तो तिच्याशी पण बोलत नाही.

बाबा घरी आले की शांत पडून राहतात बेडवर..त्यांना काही म्हणायला जायची हिंमत कोणतच नाही.

रात्री जेवतांना देखील सगळे गप्प गप्प असतात.

मला समजत नाहीये की हे असं किती दिवस चालणार आहे?

मला इतकी भीती वाटतेय.

सगळे एकमेकांशी बोलत असले की किती छान वाटतं..

आता जर कोणी बाहेरचं घरात आलं तर त्यांना वाटेल की घरात कोणी राहतंय की नाही?

मला आता बोअर होतंय….. ”

केतकी रडत रडत सांगत होती.

माझ्या एका जवळच्या मैत्रिणीची ही मुलगी. त्यांच्या घरातल्या या वातावरणात एका कामानिमित्त मी शिरले..ते नेमकी त्यांचे बाबा घरात असतांना.

मैत्रीण येईपर्यंत मला वातावरणातला ताण जाणवलाच होता अर्थात..माझी रवानगी केतकीच्या रुममध्ये झाली.

डोळ्यांनीच तिला मी ‘काही झालंय का’ विचारलं.

केतकीने आणि मैत्रिणीने घडलेला सगळा प्रसंग सांगितला. “बरं झालं.. तू स्वतःहून आलीस, नाहीतर पुन्हा यांना वाटायचं की तुला खास बोलावून घेतलं का म्हणून तुला काही सांगितलं पण नव्हतं मी ..”

चल..आधी कुणालला भेटूया म्हटलं,

त्याच्या रुममध्ये तो काहीतरी वाचत बसला होता..आम्हाला दोघींना बघून नीट सावरून बसला..

त्याची माझी चांगली दोस्ती आहे.. “काय रे..” म्हणेपर्यंत जवळ आला..

“मावशी,मला आता सहन नाही होत…मी असं वागायला नको होतं… पण कळलंच नाही ग मला, इतका राग कसा आला मला ते..मला हॉटेल मैनेजमेंट मध्ये इंटरेस्ट आहे ग..यांच्या आग्रहासाठी परीक्षा दिली..नाही मिळालं चांगलं कॉलेज..पण जे मिळेल तिथून करतोय ना आता मी बी फार्म? झालंय ना यांच्या मनाप्रमाणे?

पण मला खरंच नाही आवडत मनापासून ते करायला ..लक्ष नाही लागत माझं अभ्यासात..त्यासाठी येता जाता बाबा मला टोमणे मारत असतात..तिसऱ्या वर्षाला आहे मी तरी अजूनही चांगल्या कॉलेजमध्ये नाही जाता आलं म्हणून बोलतात ते. सकाळ संध्याकाळ नुसते मला ओरडत असतात…नाही नाही ते बोलतात..कायम ऐकून घेतो मी..वडील असले म्हणून काय झालं?

त्या दिवशी यावरूनच वाद झाला..काहीही तोंडाला येईल ते तिरकं बोलतात ते..राग वाढत चालला मनात माझ्या. म्हणाले..जन्माला येऊन काही फायदा नाही म्हणे तुझा..खायला काळ आणि भुईला भार..असं म्हणाले मला ते …मला समजलंच नाही मी काय करतोय ते..पण मी काही मुद्दाम नाही केलं..आता मलाही खूप वाईट वाटतंय..त्यांनी मारलं मला..त्याबद्दल काही नाही म्हणायचं मला पण ते मोठे आहेत म्हणून सगळ्याच गोष्टीत योग्य पण आहेत का, सांग?…”

परिस्थिती खरंच गंभीर होती. आता घरातले सगळे आपल्याशी बोलत नाहीयेत याचं ही टेन्शन आलं होतं त्याला.

एखादा प्रसंग घरात घडतो..आणि त्यात सहभागी असलेले सगळे जण त्या प्रसंगात एकदम टोकाच्या नकारात्मक भावना अनुभवतात.

प्रसंग घडून गेल्यावर त्या संदर्भातले विचार मनात सुरु होतात. एका विचारला जोडून येणारा दुसरा विचार पहिल्या विचारापेक्षा जास्त नकारात्मक असतो. मनातल्या मनात अनेक विचारांची साखळी जोडली जाते आणि वेळीच लक्ष दिलं नाही तर मनात येणारे असे नकारात्मक विचार आपल्या मनातले स्वाभाविक विचार आहेत असेच वाटायला लागते आणि वाटते की माझ्या जागी या प्रसंगात दुसरं कोणीही असतं तरी असंच वागलं असतं!

आपल्या वागण्याचे मग समर्थन केलं जातं, आधी मनातल्या मनात आणि मग दुसऱ्यांकडेही.

आपल्या घरच्या मेडिकलच्या दुकानात आपल्यानंतर आपल्या मुलाने लक्ष घालावे अशी वडिलांची अपेक्षा.

त्यांच्या दृष्टीने इतका मोठा व्यवसाय वाढवला तो कोणासाठी?

कुणालला मात्र भिकेचे डोहाळे..बायकांसारखं सतत खाण्यापिण्यात लक्ष.

आवड आहे म्हणून करायला हरकत नाही पण जगण्यासाठी इतका चांगला घडी बसलेला व्यवसाय आहे तो सोडून याला दुसरंच शिकायचं आहे..हजारदा समजून सांगितलं तरी पुन्हा तेच ते.

स्फोटक प्रसंग घडून गेल्यानंतर घरात एकदम तणावाची परिस्थिती होती.

आणि मधला मार्ग काढणं..त्यासाठी पुढाकार घेणं कोणालाच जमत नव्हतं.

मैत्रिणीच्या मते मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

आणि इथे तर मांजर पण नाही वाघ आहे!

घरातल्या प्रत्येकाने आपल्या भावना मनातल्या मनात कोंडून ठेवल्या होत्या. एकमेकांशी साधं बोलणं पण शक्य होऊ नये इतपत सगळ्यांचे एकमेकांशी असलेले संबंध ताणले गेलेले होते.

मनातली स्वप्नं आकांक्षा आणि प्रत्यक्ष व्यवहार यात कुठेतरी मधला मार्ग काढता येणं शक्य आहे का याकडे सगळ्या कुटुंबाचं लक्ष वळायला हवं होतं.

कुणालशी बोलल्यानंतर त्याला त्यातल्या त्यात एक गोष्ट पटकन समजली की अजून दोन वर्षात जर एक डिग्री मिळणार असेल तर चांगला अभ्यास करून ती मिळवता येणे शक्य आहे..म्हणजे बाबांच्या मनासारखे होऊन निदान त्यावरून बिघडणारे घरातले वातावरण नीट व्हायला तरी मदत होईल.

आणि बाबा अजून काही वर्ष व्यवसाय करू शकणार आहेत तर त्यांच्या व्यवसायात मदत करता करता त्याच्या आवडीचे शिक्षण घेणे सुद्धा कदाचित त्याला शक्य आहे. शेवटी शिकलेले काहीही वाया जात नाही आणि दोन वर्ष जर बाबांच्या मनासारखा अभ्यास केला तर त्यासाठी त्यांचे मन वळवणे, जिंकणे शक्य होऊ शकेल..

आणि हे करण्यासाठी कुणालची मनापासून तयारी होती. पाणी वाहते होण्यासाठी कुठेतरी तर सुरवात होणे गरजेचे होते.

पालकांनी मुलांच्या इच्छेप्रमाणे त्यांना शिकू द्यावे हे खरे आहे पण मुलांचा शिक्षणातील कल ओळखण्याची सुरवात शालेय वयापासून करायला हवी. पालक आणि मुलांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्न यामध्ये समन्वय असावा, एकमेकांमध्ये मनमोकळा संवाद करता येईल असे वातावरण असावे.

काही घरांमध्ये अशी अर्ध्या रस्त्यात येऊन थांबणारी, अडणारी आणि पुढे जाण्यासाठी चक्क नकार देणारी मुले बघायला मिळतात. आणि मग घर म्हणजे रोज दंगल, रोज लागणारा कर्फ्यू.

मुलांना शिकण्याबद्दल आवड निर्माण होणं, त्यांच्या आवडीचा विषय, त्यात कष्ट करण्याची त्यांची तयारी हा सगळा मुलं लहान वयात असतांनाच पालकांनी अत्यंत समजदारीने आणि जबाबदारीने लक्ष घालण्याचा विषय आहे.

आज शाळेत असल्यापासून प्रत्येक विषयात चांगले मार्क मिळवण्यासाठी आणि इतर मुलांच्या पुढेच जाण्यासाठी मुलांवर ज्या प्रकारची सक्ती केली जाते आणि त्यासाठी शिस्त लावली जाते त्यातून मुलांमध्ये शिकण्याविषयी संपूर्ण नावड निर्माण होते,असे चित्र बऱ्याच कुटुंबामधून बघायला मिळते आहे.

शालेय शिक्षणात मुलांच्या आवड, कल्पना,इच्छा,आणि सृजनशीलता आपोआप उमलतील आणि त्यांना शिकण्यात आनंद मिळेल असे चित्र आज किती कुटुंबांमध्ये बघायला मिळते?

अपवादाने एखादे घर असे मिळेल.

जगाच्या स्पर्धेत इतरांच्या तुलनेने आपल्या मुलाने कुठेही मागे पडू नये असे पालकांना वाटण्याच्या बाबतीत कुणालचे घर अपवाद नव्हतेच.

त्याला जे हवे आहे ते शिक्षण घेऊ देण्याची पालकांची तयारी नव्हती.

अर्थात पालकांच्या दृष्टीने हे सगळे त्याच्याच भल्यासाठी आणि भविष्यासाठी होते.

यशस्वी होण्याच्या, पैसे कमावण्याच्या आणि सुखी होण्याच्या पालकांच्या कल्पना आणि जगाचे त्यांना आलेले आजपर्यंतचे अनुभव यातून त्यांना वाटणारी असुरक्षितता म्हणून त्यांचेच म्हणणे त्यांना आपल्या परीने योग्य आणि काळानुरूप वाटत होते.

आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे, काय वाटते हे कुणालला आई बाबांना नेमक्या शब्दात सांगता येत नव्हते आणि आपल्या मनातली त्याच्याबद्दल वाटणारी काळजी आणि प्रेम ना आईवडिलांनाही कुणालला समजेल अश्या भाषेत त्याला सांगता येत नव्हती.

वडिलांच्या इच्छेसाठी आपल्याला आवडत नसतांनाही फार्मसी कॉलेजला प्रवेश घेणारा कुणाल आणि त्याच्या भविष्यासाठी काळजी करणारे त्याचे वडील… यात दोन्ही बाजूंनी काळजी,प्रेम आणि एकमेकांविषयी वाटणारे प्रेम नाही का? आहेच.

पण एकमेकांची प्रेम व्यक्त करण्याची भाषा एकमेकांना समजत नाहीये आणि म्हणून एकमेकांवर प्रेम करणारी ही माणसं एकमेकांना सगळ्यात जास्त दुखावत आहेत.

कुणालला जो राग आला त्याबद्दल आणि त्याने रागात केलेल्या कृतीबद्दल त्याला स्वतःला पश्चताप होतो आहे.

आणि त्याच्या रागाच्या कृतीवर त्याच्याच भाषेत उत्तर देणारे त्याचे वडील..त्यातून निर्माण झालेला शारीरिक दुखापतीचा प्रसंग आणि सगळ्यांच्याच मनात निर्माण झालेली असुरक्षितता, भीती..

या सगळ्यात प्रेम आणि चांगल्या भविष्याचे स्वप्न कुठल्याकुठे हरवून गेले.

आणि आता तर त्यांना एकमेकांच्या समोर येण्यासाठी पण अवघड वाटते आहे!

कुणाल,आई,केतकी आणि आजी-आजोबा सगळ्यांनी हळूहळू आपले रुटीन सुरु केलं.

एकट्या कुणालचे घरात मिळून मिसळून वागणे देखील पाणी वाहते होण्यासाठी पुरेसे होते.

तो मनापासून अभ्यास करतोय हे बघून काही दिवसात वातावरण आणखी निवळले आणि ऐके दिवशी बाबांनी कुणालला जवळ घेऊन त्याची माफी मागितली…सगळ्यांचे डोळे पाणावले..

आणि लवकरच घरातले सगळे मिळून नवीन टीव्ही घेण्यासाठी म्हणून बाहेर पडले.

त्यांच्या घरात निर्माण झालेला ताण निवळला ही चांगली गोष्ट आहे पण म्हणून काही गोष्ट सुफळ संपूर्ण झाली असे नाही.

आयुष्यात यशस्वी होणं… जोपर्यंत पैसा,विविध सुख-साधनं आणि न संपणाऱ्या गरजा,चैन आणि समृद्धी यांच्याशी जोडलं गेलेलं आहे तोपर्यंत ही कहाणी प्रत्येक कुटुंबातून घडत राहील. यश-अपयश, स्पर्धेत पुढे जाणं- मागे राहणं, श्रीमंती आणि समृद्धी केवळ या साठीच जगायचं असतं का आयुष्य?

‘श्रीमंत’चा अर्थ…’सुखी’चा अर्थ खरंच का इतका मर्यादित आहे?

त्यासाठी कुटुंबातला संवाद हरवावा आणि मनस्वास्थ्यांची एकमेकांत टक्कर व्हावी?

मायेच्या धाग्यांनी बांधलेल्या नात्यांमधून देखील‘आपलेपण’जपणं खरंच इतकं कठीण आहे?

नाही…कठीण नाही…फक्त नात्यांमधील समजूत कमी पडते आहे.

आपले म्हणणे समोर असलेल्या आपल्या व्यक्तीने ऐकावे असे वाटून आपण थांबून घेतो आहोत आणि समजतो आहोत की माझे म्हणणे त्याला कधीच समजत नाही.

पण त्याचे देखील काही म्हणणे आहे आणि ते मात्र समजून घेण्याची आपली तयारी नाही.

ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की मूळ हेतू कुठेतरी अगदी प्रामाणिक आहे…मुलांना आपला रस्ता स्वतः चालायचा आहे,शोधायचा आहे आणि

आई-वडिलांना वाटते आहे आम्हाला त्रास झाला तरी चालेल पण मुलांसाठी अर्धा रस्ता तयार करून ठेवतो म्हणजे आपल्या नंतर आपल्या मुलांना इतर सगळ्यांबरोबर सुख,समाधानाने राहता यावे..आयुष्य जगता यावे!

पण ‘पिकते तिथे विकत नाही’ हा मुलभूत विचार करून बघायला हरकत नाही….!

Call
Whatsapp
Appointment